Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 4902

पोरकेपणाविरोधातील लढाईचे एक तप..

$
0
0

सहारा अनाथालयाच्या संतोष गर्जेची तपस्या

समाजाच्या दातृत्वावर विश्वास ठेवून रोजची रात्र काढायची. ती संतोष गर्जेची आता सवय झाली आहे. ४२ अनाथ मुलांच्या आयुष्यातील पोरकेपण त्यांना जाणवू द्यायचेच नाही, हा त्यांचा ध्यास. सकाळी उठल्यापासून ते अंथरुणावर पडेपर्यंत मुलांना लागणारी वस्तू देणगी स्वरूपात मिळू शकते का, ती कोण देईल, या प्रश्नांच्या भोवती नियोजन बांधायचे. महिन्यातील १५ दिवस मदत मिळविण्यासाठी राज्यभर फिरायचे. गेल्या तब्बल १२ वर्षांपासून संतोष हेच काम करतात. बीड जिल्ह्य़ात रेडलाइट एरियासाठी प्रसिद्ध गेवराईत शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर ते सहारा अनाथालय चालवितात. तेथील प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर त्यांना हसू आणायचे असते. त्यांच्या आनंदासाठी, पोरकेपणाची सावली त्या मुलांवर पडू नये, हा त्यांच्या जगण्याचा ध्यास आहे. त्यांना मदत करणारे हात दिवसागणिक वाढताहेत, पण भ्रांत काही संपत नाही. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय महिन्याला दीड लाख रुपये उभे करताना होणारी दमछाक काही थांबत नाही. तरीही संतोष रोज नवे स्वप्न पाहतात. त्यांना आता मुलींसाठीही वसतिगृह उभारायचे आहे.
प्रत्येक मुलाच्या अनाथपणाची एक कहाणी. मन हेलावून टाकणारी. आतून ढवळून काढणारी. त्या कहाण्या न सांगता, मुलांविषयी कणव वाटू न देता मनात सहानुभूती निर्माण करत संस्थेला मदत मागण्याचे कसब आता संतोष गर्जेला सरावाने जमू लागले आहे. मात्र दररोजच्या अडचणी आणि त्यावर केली जाणारी मात हे काम दिव्यच. उधारीवर किराणा आणणे तर नेहमीचेच. एकदा सगळेच संपले. दिवस कसा काढायचा, असा प्रश्न आला. शेवटी खिचडी करता येईल एवढे तांदूळ आणले. तेल-मिठाची मदत मिळाली. मात्र काडेपेटी काही नव्हती. ती घेण्यासाठीही पैसे नव्हते. शेवटी एका टपरीवरून चार काडय़ा हळूच उचलून आणल्या आणि मग मुले जेवली. २०१२ मध्ये तब्बल १७ दिवस केवळ खिचडीवर काढली. तेव्हा डोळ्यात पाणी यायचे. मात्र मुलांसाठी वाट्टेल ते करताना संतोषने उधाऱ्या केल्या. ते न चुकवता आल्याने अनेकांचा राग ओढवून घेतला. अपमान गिळले. अगदी पाच-पाच रुपयांची मदत स्वीकारली. मदत मागण्यासाठी फुकट प्रवास केला. खिशात पैसे नसताना कसा प्रवास करावा, याच्या टीप देता येतील, एवढे किस्से. अनाथालयाच्या दररोजच्या गरजांवर मात करत सहाराला मदत करणाऱ्या दात्यांनी त्यांना तीन एकर जागा घेऊन दिली. तेथे आता टुमदार इमारत आहे. मुलांना खेळण्यासाठी खेळणी आहेत.
शाळेत जाण्यासाठी दुसरे वाहन उपलब्ध नसल्यामुळे मुले अॅम्बुलन्सनेच शाळेत जातात. या अनाथालयात वेश्या वस्तीतील काही अनाथ मुले, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची पोरकी झालेली मुले आणि वेगवेगळ्या कारणाने आई-वडील नसणाऱ्या मुलांचा समावेश आहे. मात्र शासन काही मदतीसाठी पुढे येत नाही. या संस्थेचे सर्व प्रस्ताव नेहमीप्रमाणे धूळ खात पडून आहेत. दररोजच्या अडचणींवर मात करत नव्या संकल्पासह संतोष रोज बाहेर पडतात तेव्हा मदतीसाठी रोज अनेकांना भेटतात. हे सगळे का करतात, कारण स्वत:च्या आयुष्यात आलेले पोरकेपण दुसऱ्याला जाणवू नये यासाठीच. किमान १०० मुलांच्या आयुष्याला सहारा द्यायचा, असा त्यांचा नवा संकल्प आहे. त्यासाठी आवश्यक असणारे मुलींचे वसतिगृह त्यांची नवी गरज आहे.


Viewing all articles
Browse latest Browse all 4902

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>