लातूर शहराला उजनी धरणातून रेल्वेने पाणीपुरवठा करता यावा, या साठी रेल्वे विभागाची लगबग सुरू असून मेमध्ये लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.
रेल्वेच्या कोटा येथील कार्यशाळेत रेल्वे वॅगन वाफेने साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. ८ एप्रिलला ५० वॅगनची पहिली रेल्वे पंढरपूर येथे पाठवली जाणार आहे. १० एप्रिलला ती पंढरपूर येथे पोहोचेल. १५ एप्रिलला ५० वॅगनची दुसरी रेल्वे कोटा येथून पाठवली जाणार असून ती १७ एप्रिलला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर रेल्वे स्थानकापर्यंत उजनी धरणातून पाणी उचलण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ती पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात लातूरला पाण्याची रेल्वे येईल.
या एका रेल्वेमध्ये तब्बल २७ लाख ५० हजार लिटर पाणी आणले जाईल. हे पाणी शहराला आठवडाभर पुरेल. उजनी धरणात लातूर शहराला जे ३ महिने पाणी लागेल, त्याच्या २ हजारपट पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे लातूर शहराला दिल्या जाणाऱ्या पाण्याचा कोणताही परिणाम अन्य मंडळींना होणार नाही. पंढरपूर व लातूर या दोन्ही ठिकाणी रेल्वेचे पाणी भरणे व उतरवून घेणे ही व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने पाणी उपलब्ध होईल. दरम्यान, लातूर प्रशासन उपलब्ध पाणीसाठय़ावर शहराची पाण्याची गरज भागवण्यावर भर देत असून अगदीच पर्याय उरला नाही तरच रेल्वेने पाणी आणण्याच्या पर्यायाचा विचार करीत आहे.
↧
लातूरला मे महिन्यात रेल्वेने पाणीपुरवठा
↧