Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 4902

२०० लीटर पाणी मृगजळच, पिण्यायोग्य शाश्वतीही नाहीच!

$
0
0

लातूरकरांच्या पाणीसमस्येत दिवसेंदिवस नव्याने भर पडत असल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाला पाणी वितरणात मदत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुरेसे मनुष्यबळ देऊनही सर्व ठिकाणी समान पाणीवाटप होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक प्रभागांत १५ दिवसांतून एकदाही पाणी मिळत नाही. मिळणारे पाणीही गढूळ व बेचव असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.
मनपाच्या वतीने ३५ प्रभागांत ७० टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, कागदोपत्री एका टँकरच्या सहा खेपा केल्या जात असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात तीन खेपांपेक्षा त्या अधिक होत नाहीत. रिपाइं नगरसेवक चंद्रकांत चिकटे यांच्या प्रभागात ३ हजार २६० घरे आहेत. मागील महिन्यात केवळ ३०० घरांना पुरेल इतकेच पाणी मिळाले. नागरिकांना दिले जाणारे पाणी शुद्ध आहे असे खात्रीने सांगता येत नाही. नागरिकांच्या प्रचंड तक्रारींना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागात रोज सहा टँकर दिले गेले तरच योग्य पद्धतीने पाणी पुरवता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रभागात साडेतीन हजार घरे आहेत. काही भागांत १५ दिवस, तर काही भागांत एक महिन्यानंतर पाणी मिळत आहे. पालिकेची यंत्रणा योग्य नसल्यामुळे आम्हाला लोकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी सांगितले.
१२ ते १५ दिवसांतून एकदा प्रभागाला पाणी मिळते. ज्या घरात पाणी विकत घेण्याची क्षमता आहे, ती मंडळी आमच्याकडे थोडा उशीर झाला तरी चालेल असे सांगत असल्यामुळे कसेबसे आपण पाणी पुरवत आहोत. सर्वाना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी प्रभागात पाच टँकरची गरज असल्याचे सांगितले. पाणी फिल्टर करण्याची यंत्रणा पुरेशी सक्षम नाही. फिल्टरमध्ये पाणी टाकले की लगेच ते टँकरमध्ये भरले जात आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरने मिळालेले पाणी उकळून व गाळून प्या, असे आवाहन करीत असल्याचे काँग्रेस नगरसेवक दीपक सूळ यांनी सांगितले.
पालिकेचे पाणी वेळेवर मिळत नाही. ते शुद्ध असत नाही. अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांच्या आरोग्याचे नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा विभागाची अधिकारी मंडळी मात्र आपण पाणी अधिकाधिक शुद्ध देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगतात. आर्वी बुस्टर पंपावर भंडारवाडीतून मिळणारे पाणी अंतिम टप्प्यातील असल्यामुळे त्यात थोडा गाळ आहे. फिल्टरमध्ये पाणी टाकल्यानंतर ते शुद्ध होण्यास किमान ३ तास द्यावे लागतात. तो वेळ मिळत नसल्यामुळे अडचणी येत असल्याचे सांगून त्याकडे लक्ष देऊ, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, असे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी सांगितले.
नागरिकांना पाणी वेळेवर दिले जात असल्याचे सांगितले खरे, मात्र त्यांनीच खोरीगल्लीतील नागरिकांना गेल्या महिन्यापासून पाणीच दिले नव्हते हेही कबूल केले. पालिकेचे पाणी शुद्ध मिळावे, यासाठी लक्ष देणार असल्याचे महापौर अख्तर शेख यांनी सांगितले.
पाणी वितरणासाठी सक्षम यंत्रणा हवी
डोंगरगाव, माळकोंडजी, भंडारवाडी, साई येथून उपलब्ध होणारे पाणी हरंगुळ व आर्वी बुस्टर येथे शुद्ध केले जाते. शुद्ध केलेले पाणी ७० टँकरमध्ये भरण्यासाठी टँकरला रांगा लावाव्या लागतात. टँकरची संख्या वाढवली तर रांगेत केवळ भर पडेल. टँकर भरण्यासाठी नवी सोय करावी लागेल. शहरातील अन्य टाक्यांमध्ये पाणी सोडून तेथून टँकर भरण्याची प्रक्रिया अमलात आणावी लागेल. जलशुद्धीकरण केंद्र ते विविध टाक्यांपर्यंत पाणी पोहोचताना वाटेत होणारी गळती बंद करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे लागेल, तरच पुढील दोन महिने नागरिकांना भरवशाने पाणी देता येईल. पाणीप्रश्नाकडे पुरेशा गांभीर्याने अजूनही प्रशासन पाहात नाही. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी बुधवारी वैदूवस्तीत जाऊन पाणी उपलब्धतेसंबंधी नागरिकांशी चर्चा केली, तेव्हा पाणी वितरणातील दोषाकडे नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले.


Viewing all articles
Browse latest Browse all 4902

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>