Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 4902

नाईकवाडे यांच्या निलंबनाचे आदेश

$
0
0

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात झालेल्या बिबटय़ाच्या तीन बछडय़ांच्या मृत्यू प्रकरणात प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख डॉ. बी. एस. नाईकवाडे यांची वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत नाईकवाडे यांना निलंबित करावे, असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवारी आयुक्तांना दिले. सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाईकवाडी यांच्या निलंबनाची मागणी जोरकसपणे लावून धरली. त्यानंतर मतदान घेऊन निलंबनाच्या बाजूने सर्वानी सकारात्मक दाखविल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सिद्धार्थ उद्यानातील रेणू या बिबटय़ाच्या मादीला १७ फेब्रुवारीला हेमलकसा येथून सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आले. ७ मार्चला रेणूला तीन पिल्ले झाली. मात्र, ती तीनही दगावली. या प्रकरणात उद्यान प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख डॉ. नाईकवाडे यांनी निष्काळजीपणा केला असल्याचा ठपका नगरसेवकांनी ठेवला. नंदकुमार घोडेले यांनी घडलेल्या घटनांची विस्ताराने माहिती देऊन नाईकवाडे यांनी कसा निष्काळजीपणा केला, हे सभागृहात सांगितले. त्यांनी केलेली चूक माफ करण्यासारखी नाही, त्यामुळे कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. हेमलकसावरून आणताना बिबटय़ाच्या आरोग्याबाबतची पूर्वपीठिका माहीत करून घेतली नाही. एक्स-रे व अन्य तपासण्या वेळेवर केल्या नाहीत. उपमहापौरांनी जाऊन बाहेरच्या डॉक्टरांना बोलावून उपचार करण्याचा प्रयत्न केला. प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख नाईकवाडे यांच्या डोक्यात नेतेगिरी घुसली आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘माननीय’ आणि ‘आदरणीय’ या शब्दांना उपहासाची छटा देऊन बहुतांश नगरसेवकांनी नाईकवाडे यांचे काम कसे निष्काळजीपणाचे आहे, हे सांगितले. नगरसेवक राजू वैद्य तर म्हणाले की, ते डॉक्टर असल्याबाबतच शंका आहे! त्यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे महापालिकेची बदनामी झाली. त्यांनी विनंती केली असती तर या मादीला सिद्धार्थ उद्यानात आणण्यासाठी वातानुकूलित गाडी देता आली असती. नगरसेवक राजू शिंदे यांनीही हा मुद्दा उचलून धरला.
नाईकवाडे यांना खुलाशासाठी बोलावून त्यांनी विचारले, तुम्हाला विदेशात कोठे पाठविले होते? ऑस्ट्रेलिया येथे महापालिकेच्या वतीने गेलो होतो, अशी माहिती नाईकवाडे यांनी दिली. त्यावर तुमच्या विदेशी जाण्याचा खर्च महापालिका करीत असेल तर वाघाला आणण्यासाठी चांगल्या गाडीची व्यवस्थाही करता आली असती. चर्चेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाईकवाडे यांची चूक असल्याचे सांगितले. गंगाधर ढगे, अय्युब जहागीरदार, अंकिता विधाते, मनोज गांगवे, गजानन बारवाल, बापू घडामोडे, माधुरी अदवंत, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी निष्काळजीपणा कसा झाला, याची माहिती सभागृहात दिली.
बिबटय़ाच्या मादीवर केलेले उपचार कसे अयोग्य होते, असेही सांगण्यात आले. डॉ. नाईकवाडे यांना तत्काळ निलंबित करावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवक महापौरांसमोर मोकळ्या जागेतही आले. त्यांनी निलंबनासाठी घोषणाही दिल्या. त्यानंतर सभागृहाचे कामकाज काही मिनिटे तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी या गोंधळातच मला खुलासा करू द्या, अशी विनंती डॉ. नाईकवाडे यांनी केली होती. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर नाईकवाडे यांना खुलासा करण्याची संधी देण्यात आली. त्यात पूर्ण काळजी घेतली असल्याचा दावा त्यांनी केला. माध्यमांच्या प्रतिनिधीला त्या दिवशी पिंजऱ्याच्या जवळपास येऊ नये म्हणून अटकाव केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बाजू ऐकून घेतली गेली नाही, असे त्यांना सुचवायचे होते. मात्र, नगरसेवकांनी त्यांनी केलेला खुलासा चुकीचा असून स्वत:ला वाचविण्यासाठी ते विसंगत विधाने करीत असल्याचे सांगण्यात आले. शेवटी महापौरांनी पशुसंवर्धन आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी व तोपर्यंत नाईकवाडे यांना निलंबित करावे, असे आदेश आयुक्त ओमप्रकाश बाकोरिया यांना दिले.


Viewing all articles
Browse latest Browse all 4902

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>