राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या ४० वर्षांत काय केले, हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसमवेत वेगळय़ा मंचावर चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, दुष्काळग्रस्तांच्या समस्या राज्य सरकारने तातडीने सोडवाव्यात. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले. धरणात पाणी नाही आणि आणखी ९ महिने काढायचे आहेत. तरीही सरकार गंभीर नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी केला. औरंगाबाद तालुक्यातील करमाड येथे वळसे पाटील यांच्या उपस्थितीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबाद शहरातील कार्यालयासमोरही कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन आंदोलन केले.
औरंगाबाद तालुक्याचे आंदोलन करमाड येथे दुपारी साडेअकराच्या सुमारास करण्यात आले. जनावरांच्या पाठीवर फलक लावून सरकारने फसवणूक केल्याच्या घोषणा त्यावर लावल्या होत्या. बैलगाडय़ांसह झालेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली. छत्रपती शिवाजीमहाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर शेतकऱ्यांसमोर वळसे पाटील यांनी आंदोलनामागची भूमिका सांगितली. कर्जमाफीच्या विषयावर सरकार गंभीर नाही. तसेच पिण्याचे पाणी व जनावरांना चारा देण्यातही फडणवीस सरकारला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात आमदार सतीश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर राष्ट्रवादीचे नेते विनोद पाटील, अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या सूतगिरणी चौकातील कार्यालयासमोरही कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. वैजापूर येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तालुका स्तरावर विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. आंदोलनात मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हिंगोलीत राष्ट्रवादीचे रास्ता रोको
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव, झिरोफाटा, औंढा नागनाथ व जवळा बाजार येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. हिंगोलीत आमदार शशिकांत शिंदे, तर वसमत येथे साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले.
वसमत येथे दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. जिंतूर रस्त्यावर सुमारे ३ हजार आंदोलनकत्रे, तसेच १०० बलगाडय़ांसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. हिंगोली येथील अग्रसेन चौकात आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजित खुराणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. कळमनुरीत माजी खासदार शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी सामाजिक सभागृहापासून मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. सेनगाव येथे हिंगोली रस्त्यावर अनिल पतंगे व अप्पाराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. औंढा नागनाथ येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर फाटा, तर झिरो फाटय़ावर प्रल्हादराव राखोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेलभरो आंदोलन शांततेत पार पडले.
↧
दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही –करमाडला राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनात आरोप
↧