महिन्यातून एकदा जेमतेम पाणी मिळणाऱ्या उदगीरवासीयांनी पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी नागपुरात धरणे आंदोलन सुरू केले.
१९६८ मध्ये उदगीर शहरातील भविष्यातील लोकसंख्या ३० हजार गृहीत धरून उदगीरपासून पाच किलोमीटर अंतरावर ३.७४ दलघमी पाणी साठवण क्षमतेचा नगरपरिषदेच्या मालकीचा तलाव उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर ते पाणी कमी पडत असल्यामुळे लघु पाटबंधारे विभागाच्या भोपणी तलावातील १.०९ दलघमी वार्षकि पाणी आरक्षण केले गेले. शहराची वाढती लोकसंख्या व सततच्या अपुऱ्या पावसामुळे दोन्ही तलावातील पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून उदगीरकरांना १० ते १२ दिवसांतून एकदाच पाणी मिळू लागले. २०१२ पासून देवर्जन मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू झाला. त्यातील पाणीसाठाही कमी असल्याने महिन्यातून एकदाच उदगीरकरांना पाणी मिळत आहे.
तिरू प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १२ कोटी रुपयांची योजना कार्यान्वित करण्याची मागणी उदगीरवासियांनी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या प्रश्नावर अनेक आंदोलने झाली. मात्र, सरकारदरबारी दखल घेतली न गेल्यामुळे सोमवारी लातूरप्रमाणेच उदगीरकरांनीही विधानभवनासमोर धरणे आंदोलन सुरू केले.
↧
पाणीप्रश्नी नागपुरात उदगीरकरांची धडक
↧