कन्नड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजप सरकारवर टीकांचा भडीमार करत आपला राजीनामा ई-मेलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र, मंत्र्यांच्या वारंवार भेटी घेऊनही निधी मिळत नाही. निधीअभावी मतदार संघातील कामं रखडून पडली आहेत. अशापरिस्थितीत जनतेसमोर कसं जायचं, हे कसले ‘अच्छे दिन’? असा सवाल उपस्थित करत हर्षवर्धन यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या आमदारानेच सरकारवर टीका करत राजीनामा दिल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले असून भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात राज्य सरकारवर सडेतोड टीका केली आहे. घोषणांचा नुसता पाऊस पडत असून प्रत्यक्षात मात्र काहीच नाही, असा टोला हर्षवर्धन यांनी लगावला आहे. केंद्र सरकारच्या योजनाही महराष्ट्र सरकार पदरी पाडून घेऊ शकलेले नाही. ग्रामीण पाणीपुरवठाकरिता असलेली एकही योजना राज्यात नाही त्यामुळे राज्यभरात गेल्या आठ महिन्यांत एकही नवीन ग्रामीण नळ योजनेचे टेंडर झालेले नाही. राष्ट्रीय पेय जल योजना देखील केंद्राने बंद करून टाकली आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱया एकही गावाला हे सरकार पाणी देऊ शकलेले नाही, अशा विविध मुद्द्यांवरून हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.