हस्ताच्या पावसाने शनिवारी तिसऱ्या दिवशीही औरंगाबादकरांची तब्येत खूश करून टाकली. दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सुमारे पाऊणतास दमदार कोसळला. या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणीच पाणी झाले. यानंतरही पावसाचे वातावरण कायम होते. शुक्रवारी रात्रीही शहर व परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. रब्बी हंगामाची आशा उंचावणारा हा पाऊस असल्याने बळिराजाचे चेहरे चिंतामुक्त झाले आहेत.
शहरात पावसाळ्यासारखे वातावरण असून सप्टेंबरच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या ऑक्टोबर हिटचा प्रभावही या पावसामुळे चांगलाच कमी झाला आहे. जिल्ह्य़ाच्या बहुतांशी भागातही या पावसाने दमदार बरसात केली. सिल्लोड व सोयगाव तालुक्यांना मात्र आजच्या पावसाने हुलकावणी दिली. जिल्ह्य़ाची पावसाची वार्षिक सरासरी ६७५.४६ मिमी असून, चालू वर्षांत शनिवापर्यंत जिल्ह्य़ात एकूण ५१५.६१ मिमी म्हणजे ८२.११ टक्के पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या हा पाऊस ७६.३४ टक्के आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक २७.५० मिमी, खुलताबाद २४.६७ मिमी, औरंगाबाद १९.९० मिमी, कन्नड ११.६३, गंगापूर ९.७८, पैठण ८.५०, वैजापूर ७ मिमी याप्रमाणे पावसाने हजेरी लावली. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्य़ात एकूण ६०५.१७ मिमी पाऊस झाला होता. या वर्षी आतापर्यंत ५१५.६१ मिमी पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पावसाने निरोप घेतला असला, तरी पावसाची आणखी काही नक्षत्रे अजून बाकी आहेत. रब्बी पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बहुतांशी सुटला असला, तरी पिण्याच्या पाण्याचे संकट लवकर टळण्यासाठी मोठय़ा पावसाची सर्वत्र प्रतीक्षा कायम आहे.
↧
ऑक्टोबर हिटचा प्रभाव हस्ताच्या पावसाने गायब
↧