उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पिचके आहे. त्यांच्यात सत्तेतून बाहेर पडण्याची धमक नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यातील आवडणारा गुण रोखठोकपणा होता, असे सांगत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. मुंबई येथे ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महापालिका निवडणूकपूर्व वेगळे लढण्याचे संकेत दिले होते, त्यावर सोमवारी आंबेडकरांनी हे मतप्रदर्शन केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्यात होते ते गुण उद्धव यांच्यात नाहीत. सरकारमध्ये त्यांचे कोणी ऐकत नसेल तर त्यांनी बाहेर पडावे. परंतु ही धमक त्यांच्यात नाही, असा आरोप करून आंबेडकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यातील रोखठोकपणा आवडत असल्याचेही सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री संघाची भाषा बोलत आहेत. ती भाषा अधिकांश मोहन भागवत यांची आहे. कारण समस्यांकडे दुर्लक्ष व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
आंबेडकर म्हणाले की, विदर्भ स्वतंत्र झाल्याशिवाय तेथील माणूस जगूच शकणार नाही. मात्र, मराठवाडा स्वतंत्र करावा की नाही, या बाबत महसुली उत्पन्नाच्या आधारे अजून अभ्यास झाला नाही. राज्याचे द्विविभाजन मान्य, पण त्रिभाजन मान्य नाही का, असे विचारले असता ते म्हणाले की, आदिवासींची लोकसंख्या आणि कोकण असाही प्रदेश करता येईल. मात्र, स्वतंत्र मराठवाडा करता येईल का, हे सांगणे अवघड आहे. विदर्भात खनिजे अधिक आहेत, वनसंपदाही आहे. त्यामुळे त्या मागणीला पािठबा असल्याचे त्यांनी सांगितले. देशात आणि राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण करून सर्वसामांन्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास उठावा, असे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. एकदा ही व्यवस्था नाकारली की, मग संघ त्यांची व्यवस्था आणेल. त्यांची अभिव्यक्ती कधी राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रगीत बदला या मागणीतून दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.
↧
उद्धव ठाकरेंचे नेतृत्व ‘पिचके’!
↧